दूरदृष्टी

मांची हे गाव संगमनेर तालुक्याच्या नकाशावर आणण्याचे  महत्वाचे  काम श्री.गंगाधर भिमाजी डोंगरे यांनी केले .डोंगरे साहेबांचे,डोंगरे गुरुजींचे गाव म्हणूनच त्याकाळी आणि त्यांच्या अखेरपर्यंत मांची ची ओळख पंचक्रोशीत होती.
गंगाधर डोंगरे यांनी प्राथमिक शिक्षक ते गटशिक्षणाधिकारी या पदापर्यंतच्या प्रवासात अनेक मित्र जोडले,अनेक अडल्या नडलेल्यांना निरपेक्ष रितीने मदत केली.कायम सायकलवरून प्रवास करणारा हा  प्रामाणिक,सहृदय माणूस दुसऱ्यांच्या मदतीसाठी सदा तत्पर असे.
ते निवृत्त होवून मांचीला राहायला येईपर्यंत मांचीची अवस्था काय होती?
शेतीसाठी लोक पावसावर अवलंबून असत.बागायती फार नव्हती.शेतीच्या पाण्याची सोय नव्हती. लोक त्यामुळे मजुरी करीत.लोक अडाणी होते. त्यामुळे आपल्या मुलांना शाळेत घालण्यास ते फारसे उत्सुक नसत. शाळासुद्धा २ किलोमीटर वर निमगाव जाळी येथे होती.
गरिबीची धग स्वत:अनुभवलेली असल्यामुळे ते सढळ हाताने गरजूंना मदत करीत.गावातील अनेकांच्या गहाण पडलेल्या जमिनी  सोडवायला त्यांनी मदत केली.कोणाच्या घरी एखादे दिवशी भाकरीसाठी पीठ नसल्याचे त्यांना कळले तर शेजारच्या गावावरून नुकतेच दळून आणलेले दळण देखील ते त्या कुटुंबाच्या हवाली करत व स्वत:च्या घरच्या मोठ्या कुटुंबाची 'आपण आजच्या दिवस भात खाऊ 'अशी समजूत काढत . 
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व माजी मंत्री बी.जे. खताळ यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीशी असलेल्या सलोख्याचा त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही फायदा करून घेतला नाही.केवळ त्यांच्या विनंतीखातर थोरातांनी उपसा जलसिंचन(Lift irrigation ) योजना मांची साठी राबवण्यास मंजूरी दिली.त्यामुळे केवळ पावसावर अवलंबून असणारी शेती बरीचशी बागायत होण्यास मदत झाली.
त्यावेळी मंत्री असलेले खताळ यांनी गावात वीज कनेक्शन घ्यावे असे त्यांना सुचवले व मांचीत वीज अवतरली. शेजारील  जवळजवळ ५००० लोकवस्ती असलेल्या आश्वी व निमगावजाळी या गावांत देखील तोपर्यत वीज आलेली नव्हती.  
   सतत सायकल प्रवासामुळे त्यांना दम्याचा त्रास होत होता.तरीपण शेवटची एक दोन वर्षे सोडली तर ते कायम फिरते होते.गावकरी त्यांना 'मोठे बाबा 'व त्यांच्या पत्नीला 'मोठी आई' म्हणत.त्यांचे १९९२ साली देहावसान झाले. संगमनेर,अकोले तालुक्यातील ५० ते १०० या  वयोगटातील त्यांना ओळखणारी माणसे आजही(साल २०१२ )आवर्जून त्यांच्या मोठेपणाची,त्यांनी अडचणीत केलेल्या मदतीची आठवण काढतात. 
मांची गावाला त्यांची आठवण कायम राहील!

0 comments:

Post a Comment

 
Copyright © 2010 Manchi(मांची ) | Design : Noyod.Com